अद्भुत गुहा मराठी गोष्ट वाचून तर बघा – TeamWrotes

 अद्भुत गुहा मराठी गोष्ट वाचून तर बघा – TeamWrotes 

    अद्भुत गुहा!

कधी कधी आपल्या आयुष्यात अकल्पनीय घटना घडतात. माझ्या आयुष्यात तर असे प्रसंग पुष्कळदा आले. या वेळी प्रश्न पडतो की हे सारे खरे आहे का? जर चमत्कार असेल तर विज्ञान वादी मनाला ते पटत नाही. पण काहीही असले तरी अशा अद्भुताची ओढ मात्र जबरदस्त असते. असाच एक प्रसंग सांगतो. राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून मी वणी येथे नोकरीला होतो. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे स्थान असलेले हे वणी.सन१९७८ सालातील ही घटना. मला गड-किल्ल्यांवर आणि जंगलात भ्रमंती करण्याची प्रचंड आवड. वणी परिसरातील सगळे गड किल्ले उत्साहाने फिरलो. सप्तशृंगी गडाला लागून वणी च्या जवळ, ‘मार्कंड्या’ चा डोंगर आणि पुढे रावळा आणि जावळा हे जोड किल्ले आहेत. सह्याद्रीच्या या उपरांगेत नंतर धोडप किल्ला आहे. या धोडप किल्ल्यावर राघोबादादांना नजरकैदेत ठेवले होते. येथील पाण्याच्या कुंडांमध्ये नयनरम्य सोनेरी शेवाळ, आणि पुरातन वस्तू मी पाहिल्या आहेत. लागून दुर्मिळ औषधी वनस्पतींनी भरलेला नवनाथांचा डोंगर, बंड्या, धोडप च्या समोर ईखारा, त्यासमोर लेकुरवाळी, हंड्या, मंचन, कांचन, बाफळ्या,कोळधेर आणि शेवटी चांदवड चा किल्लाआहे. खूप भटकलो.
रावळ्या च्या किल्ल्यावर तिथल्या किल्लेदारांचे वारस, भीमभैया तिवारी यांची ओळख झाली. सहा फूट उंची, धिप्पाड शरीर, धोतर, पांढरा शुभ्र लांब सदरा परिधान केलेले हे आकर्षक व्यक्तिमत्व! भीम भय्यांच्या सहा भावांचे एकत्र मोठे कुटुंब होते. रावळा किल्ल्यावर घनदाट जंगल होते आणि या जंगलात त्यांचे एकूलते एक वाडावजा मोठे घर होते. या घराला लागून असलेल्या कुंपणात,त्यांच्याकडे जवळजवळ दोनशे म्हशी होत्या. दुधाचा खवा करायचा आणि वणी, नासिकला नेऊन विकायचा हा या कुटुंबाचा व्यवसाय. भीम भैय्यांचे वणी गावात एक राहते घर होते. त्यांच्यासोबत मी आजूबाजूचे किल्ले भटकायचो.
 ‌ वणी परिसरातील या गड किल्ल्यांवर‌ भटकंती करण्यासाठी, अधून मधून तरुणांचे काही गट यायचे. मुंबईहून सहा तरुणांचा एक गट वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आला. सप्तशृंगी गडावरून त्यांना दूरवर मार्कंड्या चा डोंगर दिसला. या मार्कंडेय गडावर त्यांनी जाण्याचे ठरवले. वणी गावातून ते सारे मार्कंडेय गडावर चढाई करू लागले. मार्कंडेयाला लागूनच रावळा किल्ला आहे. दाट झाडीतून पाऊल वाटा शोधताना, ते वाट चुकले आणि मार्कंडेया ऐवजी रावळा किल्ल्यावर चढू लागले. डोंगर माथ्यावर आल्यानंतर मार्कंडेयाचे शिखर दुसरीकडेच दिसू लागले आणि त्यांच्या चूक लक्षात आली. जवळच झाडी मध्ये असलेले भीमभैय्यांचे घर त्यांना दिसले. भीमभैय्यांनी या तरुण मुलांची चौकशी केली आणि त्यांना, मार्कंडेयाकडे जायचा रस्ता दाखवला. त्यांनी मुलांना सांगितले,”शिखरावर असलेली मार्कंडेयाची घुमटी अगोदर पहा आणि मग उतरताना पाण्याचे कुंड लागेल. बाजूला गुहा आहे. तिथे आणलेला डबा खा. कुंडातील थंडगार पाणी प्या. विश्रांती घ्या आणि ऊन्हे उतरली की संध्याकाळी गडावरून खाली उतरा.” 
मुलांनी उत्साहाने, दाखवलेल्या मार्गावरून मार्कंड्या चा गड चढायला सुरुवात केली. ते गडाच्या शिखरावरील घुमटी जवळ पोहोचले. तिथे अतिशय थोडी जागा होती आणि प्रचंड वारा होता. समोर सप्तशृंगी शिखर दिसत होते. उद्दिष्ट साध्य झाले म्हणून मुले खूष झाली. खाली उतरू लागली. पाण्याच्या कुंडाजवळ आली. केलेल्या श्रमामुळे आता त्यांना खूप भूक लागली होती. सर्वांनी डब्यातील खाणे खाल्ले. कुंडातील चवदार आणि थंडगार पाण्याने तहान शमवली. त्यांचे लक्ष बाजूला असलेल्या गुहेकडे गेलं. दुपारचे दोन वाजले होते. हातात खूप वेळ होता. गुहेत शिरून आत काय आहे?, हे पहायचे, अशी त्यांची उत्साहाच्या भरात चर्चा सुरू झाली. अशा पुरातन गुहांमध्ये कधीकधी प्राचीन वस्तू, सापडतात. तारुण्याची रग होती, काहीतरी वेगळे करण्याची धग होती. सोबत आणलेले सामान गुहेबाहेर ठेवले. एकाने बरोबर आणलेली टॉर्च हातात घेतली. सहाही जण आत शिरले. गुहेत थोड्यावेळाने काळोख सुरू झाला. मधूनच बाजूच्या भिंतीतून पाणी झिरपत होते. पायाखाली चिखल होता. सर्वात पुढे असलेल्या तरुणाच्या हातातील टॉर्च चा उजेड अचानक बंद झाला. गुहेच्या तोंडाच्या दिशेने टॉर्च धरला तर टॉर्च चालू असायचा, पण आतल्या दिशेने धरला तर उजेड पडणे बंद व्हायचे. गुहेतून वटवाघळे, पाकोळ्या फडफडत बाहेर येऊ लागल्या. गुहा आत खूप खोलवर पुसटशी दिसत होती. त्यात एकाच्या हाताला सापाची कात लागली. मंडळी घाबरली. चौघेजण मागे फिरू लागले. दोघांनी हिंमत सोडली नव्हती ते बाकीच्यांना म्हणाले,” आम्ही थोडे आत जाऊन बघतो.”चौघे जण बंद पडलेली टॉर्च घेऊन गुहेच्या बाहेर येऊन थांबले. त्यांनी तपासून पाहिले तर टॉर्च चालू होता. गुहेतील दोघे जण पुढे जाऊ लागले. आता गुहा चिंचोळी झाली होती. दोघांपैकी एक जण कठीण परिस्थिती बघून घाबरला होता. तो ही परत फिरला. अशा परिस्थितीतही आत जाणाऱ्या एकुलत्या एक तरुणाने परतण ाऱ्याला सांगितले की,” मी थोडा वेळ पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सारे जण गुहेबाहेर माझी वाट बघत थांबून रहा. मी परत येतो. कुठेही जाऊ नका.”
गुहेबाहेर पाचही तरूण आपल्या मित्राची वाट पाहत थांबले होते. आता दोन तास होऊन गेले होते. संध्याकाळी पाच च्या सुमारास पुन्हा ते आपल्या मित्राला शोधण्यासाठी गुहेत शिरले. बाहेर चालू असलेला टॉर्च गुहेत तीस मीटर अंतर गेल्यानंतर पुन्हा बंद पडला. काळोखात गुहेत चाचपडत त्यांनी आत शिरलेल्या मित्राला हाका मारल्या.काहीच प्रतिसाद मिळेना तेव्हा घाबरून ते सारे गुहे बाहेर आले. काळोख पडेपर्यंत त्यांनी थोडा वेळ वाट बघितली आणि मग सारे रावळ्या किल्ल्यावरील भीम भैय्यांच्या घराकडे गेले. अक्षरश: रडत त्यांनी आपला मित्र गुहेत गायब झाल्याची घटना सांगितली. भीम भैयांना देखील काय करावे समजेना. आता रात्र झाली होती. ते सगळ्यांना घेऊन वणी गावात माझ्या घरी आले. सारी हकीकत ऐकल्यानंतर या घटनेचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. मुलांना धीर दिला. “हा अपघात आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन, घडलेले सारे सांगणे गरजेचे आहे”, हे मी त्यांना सांगितले. तिथले पोलिस इन्स्पेक्टर ओळखीचे होते. आम्ही सारे जण त्यांना भेटावयास गेलो. त्यांनी सगळी घटना ऐकून घेतली आणि सांगितले,”आता खूप रात्र झाली आहे. तो तरुण दुपारी गुहेत जाण्यापूर्वी जेवला आहे. त्यामुळे आता त्याच्या भुकेची काळजी नाही. उद्या सकाळी आपण शोधमोहीम सुरू करू.”
मी तेव्हा बॅचलर असल्यामुळे एकटाच राहात होतो. सारे जण मुक्कामाला माझ्या घरी आले. भीम भैय्यांनी जेवणाची सोय केली. गुहेत राहिलेल्या तरुणा विषयी माहिती मिळाली. कॉलेज शिक्षण घेणाऱ्या त्या तरुणाचे नाव होते, ‘आनंद लेले’. उत्साही आणि हुशार मुलगा. मुंबईला अंधेरी परिसरात राहत होता.
दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सारे मार्कंडेयाच्या डोंगरावर गेलो. सोबत इन्स्पेक्टर आणि त्यांचे दोन पोलिस होते. आता गुहेत शिरताना सर्वात पुढे दोघे पोलीस होते. त्यांच्या मागे मी, भीम भैय्या, आणि बाकी सारे होते. पोलिसांकडे शिकारी साठी वापरले जाणारे दोन मोठे टॉर्च होते. आताही तसेच घडले. तीस मीटर अंतर गेल्यानंतर दोन्ही टॉर्च बंद पडले. तरीही घनदाट काळोखात आम्ही थोडे अंतर पुढे चाचपडत गेलो. खाली चिखल आणि पाणी होते. एक दोन साप सळसळत गेल्यासारखे वाटले. गुहा चिंचोळी झाली होती. काळोखात पुढचे काहीच दिसत नव्हते. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. खूप हाका मारल्या. आतून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. कुजल्याचा वास ही येत नव्हता. फक्त एकच जण पुढे जाईल एवढी ती लहान झाली होती. आत कदाचित पुरेसा प्राणवायू नसेल ही भीती होती. शोधमोहीम सोडून आम्ही सारे बाहेर आलो. गुहेत वाघासारखे हिंस्त्र प्राणी ही असतात. त्यामुळे आनंद आत जिवंत असेल का हा ही प्रश्न होता. गुहेबाहेर बसून पोलिसांनी रीतसर पंचनामा केला. तरुणांचे जबाब घेतले. आम्ही सारे दु:खी अंतःकरणाने वणी मध्ये परतलो.माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता. गुहेत टॉर्च का पेटत नव्हता? पुरेसा उजेड असता तर कदाचित आत खोलवर जाता आले असते. सारे तरुण मुंबईला परत गेले.
दोन दिवसांनी सकाळी चौकशी करत माझ्या घरी, काही माणसे आली. मुंबईहून, गुहेत गायब झालेल्या आनंद चे काका, दोन नातेवाईक, आले होते त्यांनी सोबत डोंबिवली येथील, केळकर या ट्रेकिंग करणाऱ्या आणि विविध गुहांचा शोध लावणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या दोन निक्ष्णात मित्रांना आणले होते. आम्ही सारे पुन्हा गुहेतील शोध मोहिमेवर निघालो.
सारे गुहेत शिरलो. केळकर तयारीनिशी आले होते. त्यांनी डोक्याला खाणींमध्ये वापरतात तसा हेड टॉर्च वापरला होता. आम्हाला ते सारे नविन होते. नेहमीप्रमाणे चमत्कार झाला आणि गुहेत तीस मीटर अंतरावर त्यांचा हेड टॉर्च बंद पडला. सगळ्यांच्या मनात एक अनामिक भीती दाटली. केळकरांनी सोबत काडेपेटी आणि मशाल आणली होती. गुहेत मशाल पेटवण्याचा एक फायदाही असतो आणि एक तोटाही असतो. मशाली मुळे उजेड पडतो. पण पेटत्या मशाली मुळे हवेतील ऑक्सिजन लवकर संपतो. मशाल पेटेना. काळोखात चाचपडत चिंचोळ्या गुहेतून आम्ही पुढे निघालो. पायाखाली पाणी आणि निसरडा चिखल असल्यामुळे पुढे जाता येईना. केळकर ने स्वतःच्या कमरेला एक लांब दोरी बांधली आणि आम्हाला सांगितले तुम्ही परत फिरा. मी एकटा पुढे जातो. काही धोका वाटला तर मी दोरी हलवेन. त्यावेळी दोरी खेचून मला गुहे बाहेर घ्या. आम्ही गुहेबाहेर आलो. काहीवेळाने दोरी हलू लागली हे पाहून आम्ही दोरी खेचली. चिखलाने बरबटलेला, दमलेला केळकर बाहेर आला. तो सांगू लागला,”मी पुष्कळ अंतर आत गेलो. गुहा एकदम बारीक झाली होती. पुढे कदाचित प्राणवायू संपला असता. आनंदला खूप हाका मारल्या पण प्रतिसाद मिळाला नाही. तो जिवंत असता तर काहीतरी सुगावा लागला असता. कदाचित गुहां मधून हिंडणाऱ्या वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांनी, त्याला खाऊनही टाकले असेल. जिवंत नसेल तर त्याची बॉडी सुद्धा तिथे असेल असे वाटत नाही.”….हे सारे ऐक ल्यानंतर आनंदच्या नातेवाईकांच्या उरल्यासुरल्या आशा सुद्धा संपल्या. दुखी अंत:करणाने आम्ही परतलो. आनंदच्या काकांनी, मनाचे समाधान म्हणून त्याचे श्राद्धा सारखे विधी करायचे ठरवले. सारी मंडळी मुंबईला परत गेली.
आणि मग तो विस्मयकारी दिवस उजाडला. या घटनेला सहा महिने होऊन गेले होते. त्या दिवशी संध्याकाळी काळोख पडण्याच्या सुमारास रावळा किल्ल्यावरील भीम भैय्यांच्या घरा बाहेर कोणीतरी हाका मारत होते. भीम भैय्या बाहेर आले तर समोर, आनंद उभा होता. भीम भैय्या चकित झाले. आनंद काकुळतीच्या स्वरात त्यांना विचारत होता,” ‌ भीम भैय्या माझे मित्र कुठे गेले?, माझी वाट बघा म्हणून मी त्यांना सांगितले होते. गुहेत मी दोन-तीन तास थांबलो होतो. आता संध्याकाळी मी बाहेर आलो तर तिथे कोणीही नाही. ते सारे कुठे गेले?”………. हे ऐकून भिम भैया चमकले. अरे बापरे! हा मुलगा तोच आहे का?, या मुलाच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? या कल्पनेने ते घाबरून गेले. काय उत्तर द्यावे ते ही त्यांना समजेना. शेवटी आनंदला घेऊन डोंगर उतरून रात्री माझ्या घरी आले. आनंद सापडला हे पाहून मला अत्यानंद झाला. सहा महिन्यापूर्वी ची घटना डोळ्यासमोर आली. आनंदला बसवून शांत केले. पिण्यासाठी पाणी दिले. त्याच्या नकळत पोलीस इन्स्पेक्टरना घरी येण्यासाठी निरोप पाठवला. तेही घाईघाईने साध्या कपड्यात घरी आले. आनंदला मी भूक लागली का हे विचारले. त्याने निक्षून सांगितले की भूक लागलेली नाही. त्याचे फक्त एकच पालुपद चालू होते. “माझे मित्र कुठे गेले? मी थोडावेळ गुहेत आत होतो. ते का थांबले नाहीत?”……
माझ्या लक्षात आले. आनंदला मानसिक धक्का लागू नये म्हणून त्याला हळूहळू समजावून सांगावे लागणार होते. मध्ये खूप काळ गेला आहे हे त्याच्या लक्षात आले नव्हते.  मी बोलायला सुरुवात केली.”आनंद तू गुहेत शिरलास त्यानंतर काय काय झाले हे प्रथम आम्हाला सांगतोस का?”
आनंद सांगू लागला, “गुहेत मी एकटाच पुढे चालत गेलो. कसे काय ते माहीत नाही, पण पुढे चालत जावे असेच वाटत होते. गुहेची उंची कमी झाली. ओणवा होऊन मी चालत होतो. थोड्यावेळाने गुहा इतकी लहान झाली की मला रांगत जावे लागले. गुहेच्या बाजूच्या भिंती चाचपडत, अंगा खालचा निसरडा चिखल तुडवत मी पुढे निघालो. आता अक्षरश: सरपटत जावे लागत होते. मागे फिरायचे ठरवले तर गुहा इतकी चिंचोळी होती,की वळताही येत नव्हते. निसरडा चिखल आणि पाण्यामुळे उलटे सरकता येत नव्हते. शेवटी असे ठरवले की पुढे जात राहावे. पुढे कुठेतरी वळता येईल. सारा धीर एकवटून पुढे जात राहिलो. दुरून कुठेतरी प्रकाश दिसू लागला. छान हवा येत होती. या गुहेला दुसरे टोक आहे आणि त्या दारातून बाहेर पडता येईल असे वाटले. आता सुटकेचा मार्ग मिळाला. गुहा सुद्धा मोठी होत चालली. मी किती वेळ प्रवास करत होतो हे ही कळले नाही. प्रकाशाच्या दिशेने मी धावत सुटलो. अचानक समोर गुहेतील एक प्रशस्त भाग आला. एक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत दगडावर बसलेले होते. येणारा प्रकाश त्यांच्या डोक्या मागून येत होता. गुहेला दुसरे दार नव्हते. पण तिथे स्वच्छ हवा, प्रकाश, आणि सुगंध दरवळत होता. वेगळेच चैतन्यमय वातावरण होते. त्या ऋषींसमोर उभे राहून मी नकळत हात जोडले. माझी हालचाल जाणवुन ऋषींनी डोळे उघडले. मंदस्मित करीत त्यांनी संस्कृत भाषेत मला विचारले,”कस्त्वम?” शाळेत संस्कृत शिकल्यामुळे अर्थ लक्षात आला की ऋषी विचारत आहेत, तू कोण आहेस?.. मी सांगितले की सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर या डोंगरावर आलो होतो. ही गुहा पाहून आत शिरलो. समोर तुम्ही दिसलात. ऋषींनी मला जवळ बोलावले. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा,डोळे बंद कर. मी थोडावेळ डोळे बंद केले. त्यांनी पुन्हा सांगितले आता डोळे उघड. मी डोळे उघडले. मी ऋषींना विचारले, की आता मी गुहेच्या बाहेर कसा जाऊ? त्यांनी सांगितले की, जसा आलास असाच प्रवास करत परत जा. ऋषींना नमस्कार करून मी मागे फिरलो आणि गुहेतून बाहेर आलो. मी गुहेत दोन-तीन तास थांबलो असेन. बाहेर आलो तर कोणीही मित्र दिसेनात. मला सांगता का, माझे मित्र कुठे गेलेत?”….
तो हे सारे सांगत असताना माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. आनंदला मानसिक धक्का बसू नये त्याचा उत्साह वाढावा यासाठी मी त्याला म्हटले,”अरे तुला तर प्रत्यक्ष मार्कंडेय ऋषींचे दर्शन झाले आहे. खरंच तू पुण्यवान आहेस. असे भाग्य कोणाच्याही नशिबी नसते. मार्कंडेय ऋषी हे चिरंजीव आहेत. हा मार्कंडेय यांचा डोंगर आहे. त्यामुळे त्या गुहेत दिसलेले ते ऋषी म्हणजे मार्कंडेय आहेत.”
हे ऐकल्यावर आनंद चा चेहरा समाधानाने उजळून निघाला. त्याचा आत्मविश्वास वाढला. आता त्याला हळूहळू सारे सांगायचे मी ठरवले. भीम भैय्या, इन्स्पेक्टर आणि तिथे जमलेले इतर या सर्वांसमोर अनेक प्रश्न होते. मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे या चमत्कारा मागचे विज्ञान हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. आनंदला अजूनही भूक लागली नव्हती. त्याच्या दृष्टीने दोन तास हे बाहेरच्या जगाच्या दृष्टीने सहा महिने होते. ही काळाची तफावत का?
📖💥
मी शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. आनंद गुहेतून आत जायला लागल्यानंतर तो एका वेगळ्याच ‘मिती’ मध्ये शिरला. ‘मिती’ म्हणजे ‘डायमेन्शन’. माणसाला तीन मिती माहिती असतात. लांबी, रुंदी, आणि खोली. या तीन मिती प्रत्यक्ष दिसतात. अनुभवता येतात. जगात यापलिकडे अजून काही मिती आहेत. या मिती माणसाने अजून पाहिल्या नाहीत. शास्त्रीय थेअरी प्रमाणे चौथी मिती म्हणजे ‘काळ’…. आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. जेव्हा त्याने अणूच्या सूक्ष्म कणा मध्ये प्रचंड ऊर्जा किंवा ताकद आहे हे सांगितले तेव्हा कोणाचाही विश्वास नव्हता. हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबाॅंब च्या स्फोटानंतर अणू ची ताकद किती प्रचंड आहे हा E=mc2 सिद्धांत प्रत्यक्षात आला. घनता समुच्चय (m=Mass) म्हणजे घन वस्तू नसून ऊर्जा (E= energy) चे एक रूप आहे.c म्हणजे प्रकाशाच्या गतीचा वेग….. थोडक्यात म्हणजे परमाणुत असलेली ऊर्जा(E)= त्याच्या घनता समुच्चय(m)× प्रकाशाच्या गतीचा वर्ग(c2)..आइन्स्टाईनचे सिद्धांत सिद्ध करता आले, तेव्हा ते खरे आहेत हे प्रत्यक्षात पाहता आले. त्याचा काळाचाही सिद्धांत असाच आहे. हे सारे वर्णन पुराण वांग्मयातील ‘बृहदारण्यकोपनिषद’ मध्ये ( ४.५.१५) या श्लोकात आले आहे. टाईम डायमेन्शन मध्ये काळ थांबतो. उदाहरण द्यायचे झालेच तर, एखादे अंतराळ यान प्रकाशाच्या वेगाने, म्हणजे, सेकंदाला एक लाख ८६ हजार मैल या वेगाने प्रवास करत चालले आहे. या अंतराळ यानात एक अंतराळवीर आहे. असे अंतराळ यान शंभर वर्षांनी पृथ्वीवर परत आले, तर त्याअंतराळवीराचे आजचे वय शंभर वर्षांनी वाढलेले नसेल. ते पूर्वीचेच असेल, कारण प्रकाशाच्या वेगामुळे त्याने काळ या मितीत प्रवास केलेला आहे. या मितीत काळ तिथेच स्तब्ध होतो. त्यामुळे त्याचे वय वाढत नाही. कोणतीही वस्तू अतिवेगाने गेल्यास सापेक्ष काळ मंदावत जातो. साधे उदाहरण आहे रोज रात्री आपण तारे तुटताना पाहतो, ते हजारो प्रकाशवर्ष दूर असतात. म्हणजे ती घटना जरी आज आपण पहात असलो, तरी ती कित्येक अब्ज वर्षापूर्वीच घडलेली आहे. अवकाश आणि काल यांची जमलेली सांगड आम्ही वेगळी करू शकलो नाही, तर मग हे ‘काल’ नावाचे चौथे परिमाण(मिती) अस्तित्वात असल्याचे मानावेच लागेल. हे शास्त्राने मान्य केले आहे.”
सारेजण कुतूहलाने ऐकत होते. मी पुढे बोलायला सुरुवात केली,”आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ते मार्कंडेय ऋषीच होते का? ते अजून जिवंत कसे? काळाचे परिमाण काय? आणि ही चौथी मिती तिथे कशी अस्तित्वात आली?…
आधुनिक शास्त्राने तर या गोष्टी सिद्ध होतातच पण प्राचीन भारतीय ग्रंथातून सुद्धा, हे सारे सिद्धांत यापूर्वीच वर्णन केले आहेत.
आपल्या देशाला हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपली सांस्कृतिक परंपरा किती समृद्ध आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या प्राचीन वांडःमयांचं वाचन, मनन आवश्यक आहे.अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने आजच्या शास्त्रज्ञांनी विश्वाच्या उत्पत्ती संबंधाने ‘बिग बँग’ थेअरी सारखे जे सिद्धांत मांडले आहेत, त्याच्याशी साधर्म्य दाखवणारे सिद्धांत आपल्या प्राचीन वांडःमयात म्हणजे ऋग्वेदात सापडतात.
अश्‍वत्थामा बलिर्व्यासो| हनुमानश्‍च बिभीषण:
कृप: परशुरामश्‍च| सप्तैते चिरंजीविन:’
या श्‍लोकामध्ये सामावलेले सर्व सात चिरंजीवी अजूनही आजच्या भौतिक युगात अस्तित्वात आहेत, असे आजही मानले जाते. विज्ञान व तर्काच्या कसोटीच्या मापदंडानुसार हे आजच्या वातावरणात सिद्ध करणे अत्यंत कठीण असले, तरी ते पूर्णपणे अशक्यच आहे असे म्हणता येत नाही.
या चिरंजीवींपैकी अश्‍वत्थामा, हनुमान हे सदैव इहलोकातच वावरतात. म्हणजे त्यांचा माणसांच्या दैनिक जीवनाशी सदैव संपर्क येतो, अशी मान्यता आहे. ‘अश्‍वत्थामा’ अनेकांना भेटला आहे असे उल्लेख आहेत. महाभारतातले हे एक रहस्यमय पात्र! आतापर्यंत काही लोकांनी यांचे दर्शन घेतलेे. तेही विविध रूपात असे म्हटले जाते. ‘हनुमान’ म्हणजे आपला जीव की प्राण! गावाच्या वेशीवर, गल्लीबोळात, शहरात सर्वत्र हनुमान मंदिरे आढळतात. इतका हनुमान आजच्या समाजात व हृदयात सामावलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. फार मोठ्या प्रमाणात इहलोकात वावरणारे ‘हनुमान’ हे दैवत आपल्या समाजात सप्तचिरंजीवींपैकी सर्वात लोकप्रिय ‘चिरंजीव’ आहे. वरील श्लोकात उल्लेख केलेले सात जण हे जन्मतः चिरंजीव समजले जातात. पण मार्कंडेय ऋषी हेसुद्धा चिरंजीव आहेत.
भ्रुगू ऋषींच्या कुळातील मृकुंडू ऋषींचा मार्कंडेय हा मुलगा. महादेवाच्या वरदानाने झालेला हा मुलगा प्रचंड बुद्धिमान पण अल्पायुषी(आयुष्य फक्त सोळा वर्षाचे) असेल असे महादेवानी सांगितले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी बाल मार्कंडे यांनी महामृत्युंजय मंत्र म्हणत महा देवांची घोर तपस्या केली. त्यावेळी प्राणहरण करायला आलेल्या यमाला महादेवांनी रोखले आणि बाल मार्कंडेयाला अमर होण्याचा वर प्रदान केला. तेव्हापासून मार्कंडेय हे सुद्धा चिरंजीव मानले जातात.
महामृत्युंजय मंत्राचे प्रणेते महर्षी मार्कंडेय यांनी,’मार्कंडेय पुराण’ या ग्रंथाची निर्मिती केली. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या करून भगवतीच्या ‘सप्तशती’ची रचना केली यात समस्त मानव कल्याणासाठी सातशे श्लोक आहेत.
आनंदला आजही ध्यानस्थ अवस्थेत दिसलेले ऋषी हे मार्कंडेय आहेत असे आपण मान्य करू या. काळाच्या मितीत जर ते असतील तर ते अजून जीवंत असतील, असे आधुनिक शास्त्राचा सिद्धांतही सांगतो. पुराणातही हा सिद्धांत आणि प्रकाशाचा वेग पुढील प्रमाणे सांगितला आहे.
            हिंदू धर्मशास्त्रात काळासंबंधी जितका विचार झाला आहे, तितका जगाच्या पाठीवर कुठल्याही संस्कृतीत झाला नसावा. मुळातच आपण ‘कालचक्र’ हा शब्दप्रयोग करतो, म्हणजे घटनांची पुनरावृत्ती होत काळ पुढे जातो हे आपण गृहीत धरतो. 
विष्णू पुराणांमध्ये, (१,३,१२-१५) या श्लोकात दिलेली कल्पना अशी आहे की ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता. त्याचा एक दिवस म्हणजे विश्वाचे एक कल्प अथवा विश्वाचे सर्व आयुष्य.
कालचक्र चार युगांचे बनलेले आहे असे आपण मानतो. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग अशी चार युगे. त्यांची कालमर्यादाही ठरलेली आहे. 
१) कलियुगाच्या चौपट काळ सत्य युगाचा.         
२) कलियुगाच्या तिप्पट काळ त्रेतायुगाचा
३) कलियुगाच्या दुप्पट काळ द्वापार युगाचा.
 म्हणजेच कलियुगामध्ये ४,३२,००० वर्षे असतात, तर द्वापारयुगात८,६४,०००वर्षे.
कलीच्या दुप्पट त्रेतायुगात १२,९६,०००, कलीच्या तिप्पट, तर सत्ययुगात १७,२८,००० कलीच्या चौपट वर्षे असतात. एक महायुग = ४३,२०,००० इतकी वर्ष. 
            पृथ्वीवरील सूक्ष्म जीवसृष्टी पासून माणसापर्यंत उत्क्रांती व्हायला एक महायुग लागले. अशी ७१ महा युगे + १ सत्ययुग = १ मन्वंतर = ३०,८,४,४८,००० वर्षे. आकाशगंगेच्या केंद्राभोवती एक भ्रमण पूर्ण करण्यास आपल्या सूर्याला १ मन्वंतर लागते. अशी १४ मन्वंतरे +१ सत्ययुग =१ कल्प ४,३२०,०००,००० वर्षे= १०००महायुगे, आधुनिक शास्त्राच्या गणिताप्रमाणे पृथ्वीच्या उत्पत्तीला ही एवढीच वर्षे झाली. ही तुलना प्राचीन हिंदू गणितज्ञांना भूषणावह आहे. दोन्ही आकडे केवळ कल्पनेचे अंदाज आहेत पण प्राचीन काळी, भारतीय ऋषींचे ज्ञान हे कौतुकास्पद आहे. त्यांनी श्लोकात लिहिलेले हे आपल्या विश्वाचे सध्याचे वय आहे. असे २ कल्प = ब्रह्मदेवाचा १ दिवस म्हणजे ८६४ कोटी वर्षे.
        ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालावधीत या विश्वाची उत्पत्ती होऊन पूर्ण उत्क्रांति पर्यंतचा प्रवास होतो, आणि ब्रह्मदेवाच्या एका रात्रीत या सर्व विश्वाचा नाश होतो. परत दुसऱ्या दिवशी उत्पत्तीपासून सुरुवात होते असे हे कालचक्र फिरत राहते. या संकल्पनेला पूर्वी आपण हसत होतो, पण आता नव्या नव्या शोधा मुळे हे सत्य असू शकते असे मानण्या
 पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. प्रकाशाच्या वेगाचा जो सिद्धांत पुराणात मांडला आहे, आधुनिक शास्त्रही तेच सांगते.
पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या सायणाचार्यांच्या ऋग्वेदा वरील ‘ऋग्वेद संहिता’ या ग्रंथात प्रकाशाच्या वेगा संबंधी उल्लेख सापडतो तो श्लोक असा आहे
     ‌•” तरणि र्विश्व दर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य।
  विश्वमाभासी रोचनम ।।
  योजनानां शते द्वे द्वे शते द्वे च योजने ।
   एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोस्तुते ।।४।।•
         *ऋग्वेद संहिता (१-५०-४)
   
अर्थ : हे सूर्या ! तुझी गती शीघ्र असल्यामुळे तुझ्या पर्यंतचे अंतर कापणे अवघड आहे . एका निमिषार्धात म्हणजे अर्ध निमिषांत जो २२०२ योजने अंतर पार करतो, त्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.
   योजना व निमिष यांचे मूल्य वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे दिलेले आहे. आर्यभटाच्या काळात इसवी सन ४७६ मध्ये एक योजन = १२ किलोमीटर होते. तर दीडशे वर्षानंतर आलेल्या ह्यू एन त्संग त्याच्या भारत भेटीनंतर ली या चिनी एककात एक योजने =५ मैल =८ किलोमीटर इतके होते असे लिहितो. इसवी सन १००० मध्ये अल्बिरूनी त्याच्या इंडिका या ग्रंथात, एक योजना =३२०००असे नोंदवतो . एका दिवसाचे १७२८००निमिष होतात. याचा अर्थ एक निमिष म्हणजे अर्धा सेकंद, १ यार्ड बरोबर ०.९१४४ मिटर ही मूल्ये गृहीत धरून गणित केल्यास, प्रकाशाचा वेग येतो २.५८×१०^८ मीटर / सेकंद. हा वेग प्रत्यक्षातल्या आधुनिक शास्त्रात सांगितलेल्या वेगाच्या खूपच जवळ जातो.
प्राचीन वाड:मयात असे असंख्य शास्त्राधारित उल्लेख सापडतील ज्यावरून आपल्या पूर्वजांचे या ब्रम्हांडा बद्दलचे ज्ञान किती गहन होते हे समजेल.
प्रकाशाच्या वेगाचा सिद्धांत आणि काळ ही मिती, यामुळे मार्कंडेय त्याच मितीत वावरत असल्यामुळे, चिरंजीव आहेत, म्हणून ते आजही दिसू शकतात. आनंदला भासत असलेला एक दोन तासाचा काळ, बाहेर तीन मितीत जगणाऱ्या आपल्या दृष्टीने चक्क सहा महिन्याचा आहे.
आनंदला आता वास्तवाचे भान यायला सुरुवात झाली होती. नेमके काय घडले हे त्याला समजू लागले. “सर!”. तो आश्चर्य चकित होऊन माझ्याकडे पाहात म्हणाला,” म्हणजे मी चक्क सहा महिने गुहेत होतो. हे माझ्या लक्षातच आले नाही. मी बाहेर येऊन माझ्या मित्रांना शोधत बसलो. ते मला सोडून निघून गेले यामुळे मी उद्विग्न झालो होतो.”
आनंद चे बोलणे ऐकून आम्ही सारे खुश झालो. मानसिक धक्क्यातून तो हळू हळू बाहेर येत होता. मी त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो, “अरे ! तुला, मी इथे आल्यावर भूक लागली आहे का? असे विचारले. तू नाही म्हणालास.”……मी सगळ्यांकडे पाहत म्हणालो,”मंडळी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? आनंदाची दाढी सुद्धा वाढलेली नाही.त्याला गुहेत एक ऋषी दिसले, प्रकाश दिसला. आनंद गुहे बाहेर आला तरी पण त्याला काळाचे भान राहिले नाही. तहान भूक नाही, दाढी वाढली नाही याचा अर्थ एकच ! त्याच्यासाठी काळ तिथेच थांबला होता. आणि मग माझ्या लक्षात आले, या सार्‍या मागे विज्ञान आहे, पुराणकाळी श्लोकांमधील उद्धृत होणारे प्रगाढ ज्ञान आहे. या साऱ्याचे वाचन असल्यामुळे, घटनाक्रम माझ्या लक्षात आला. माझ्या परीने त्याचा अर्थ मी लावला.”
सगळे अजूनही संभ्रमित अवस्थेत होते. आनंदने कुतुहलाने विचारले,”सर! गुहेतून मी भान विसरून प्रकाशाच्या दिशेने चालत राहिलो. वंदनीय मार्कंडेय ऋषींच्या आसमंंतात तो दिव्य प्रकाश होता, तो प्रकाश नेमका कोणता?”
मी बोलायला सुरुवात केली.”आपण चित्रकारांनी प्राचीन काळापासून रेखाटलेल्या चित्रांमध्ये, एक गोष्ट पहात असाल. राम, कृष्ण, विष्णू यांसारखे देव, महावीर, बौद्ध, यांसारखे महात्मे, संत यांच्या डोक्यामागे एक प्रकाशमान वलय काढलेले दिसते. त्यांचे पावित्र्य आणि महात्म्य, दर्शवण्यासाठी त्यांच्या देहा भोवती तेजोवलय किंवा प्रभा चित्रित केलेली असते. बुद्धिमान, चारित्र्यवान, भक्तीवान,योगी व्यक्तींच्या चेहऱ्यावरील तेज आपणासही सहज जाणवते. ही केवळ चित्रकारांची कलात्मकता किंवा कविकल्पना नाही. याला आधुनिक शास्त्राचा आधार आहे.
प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे, ‘स्थितिज विद्युत क्षेत्र’ (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते. ते शरीरातून बाहेर पडणाऱ्या विद्युत-चुंबकीय स्पंदन लहरी मुळे सतत कंपन पावत असते. पायथागोरसचा असा कंपनशील विश्वाचा सिद्धांत आहे. आधुनिक तंत्रज्ञानात स्पंदन लहरींचे तंत्रांचे महत्त्व सर्वांना ज्ञात आहे. या लहरींतून सूक्ष्म प्रकाश निर्माण होतो. प्रत्येक व्यक्तीच्या सभोवती असलेल्या, या प्रकाश वलयाचे चित्रीकरण अत्याधुनिक ‘किर्लीयन फोटोग्राफी’ तंत्रज्ञानाने केले जाऊ शकते. या तेजो वलयात इलेक्ट्रॉन नसलेल्या आयनीभूत अणूंचे (आयोनाईज्ड) अस्तित्व असते. हा वायूरुप बायो प्लाझ्मा असू शकतो. मार्कंडेय ऋषींचे सारख्या प्रचंड तपस्या केलेल्या, योगसाधनेने अवर्धु असलेल्या, चिरंजीव व्यक्तीचे प्रकाश वलय निश्चितच अतिशय तेजस्वी असणार. चौथ्या मितीत गेल्यानंतर आनंदला ते स्पष्ट दिसले. अध्यात्मिक ग्रंथातूनही तेजोवलय कोश (ऑरा) या विषयी माहिती आणि तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे.
आत्तापर्यंत माझे सारे कथन मन लावून ऐकणाऱ्या इन्स्पेक्टरनी मनात दाटून राहिलेली एक शंका विचारली, “सर ! गुहेत थोडे अंतर किंवा पंचवीस-तीस मीटर वर गेल्यानंतर काळोखात टॉर्च आपोआप बंद का होत होता?. बाहेर आल्यावर त्यातून उजेड येत होता किंवा तो व्यवस्थित होता. टॉर्च बंद होणे हे गुहेत शिरलेल्या मुलांनी, आम्हा पोलिसांनी, इतकेच नव्हे तर शोधमोहिमेत भाग घेतलेल्या, केव्ज एक्सप्लोरर तरुणांनी सुद्धा अनुभवलेले आहे. आम्ही तर याला चमत्कारा पेक्षा भुताटकी समजत होतो. हे असे का होत होते?”……
मी विचारांची आणि शब्दांची जुळवाजुळव करत बोलू लागलो. “सापेक्षता सिद्धांतात ‘काळ'(टाईम) ही एक चौथी मिती आहे हे सांगितले आहे, त्याच प्रमाणे (स्पेस) किंवा ‘अवकाश’ ही एक पाचवी मिती आहे हे सांगितले आहे. या मितीत वस्तुमान आकुंचित होत जाते. त्याचा दाब इतका प्रचंड असतो की प्रकाशही नष्ट होतो. प्रकाशाचे रूपांतर अंधारात होते. हा सिद्धांत कृष्ण विवरांच्या(ब्लॅक होल) शोधामुळे सिद्ध होतो. या शोधातील भारतीय शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचे योगदान सर्वांनाच माहित आहे. त्या अद्भुत गुहेत कदाचित मार्कंडेय ऋषींच्या अस्तित्वामुळे असे काही घडत होते की, अवकाश मितीची निर्मिती सुरू झाली होती. आपणा सर्वांना फक्त संवेदना झाली. टॉर्चच्या उजेडाचे अंधारात रूपांतर झाले. घाबरून सारे परत फिरलो. आनंद मात्र स्वतःची मानसिक शक्ती (विल पॉवर), एकवटून (कॉन्सन्ट्रेट करत)जाणिवा आणि नेणीवांच्या पलीकडे गेला. गुहा आत किती लांब आहे हे माहीत नाही. कदाचित ती जास्त लांब नसेलही, पण तिसर्‍या आणि चौथ्या मितीतला त्याचा प्रवास कृष्ण विवरातून केल्यासारखा अनाकलनीय होता. योग साधने वरील सप्त शती सारख्या ग्रंथाची रचना करणाऱ्या मार्कंडेय ऋषींनी, आपल्या सिद्धिंच्या बळावर आनंदला या दोन्ही मितींमध्ये प्रभावित केले असेल.”……
💥📖
आता सर्वजण या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले. आनंदला आता भुकेची जाणीव झाली होती. तो नियमित जगात आला होता. त्याने हसत हसत विचारले,” माझ्या शोधासाठी काही प्रयत्न झाले का?”…आता सर्वांना कंठ फुटला होता. कोणी, किती आणि कसे प्रयत्न केले हे त्याला सर्वांनी सविस्तर सांगितले. घरच्यांनी त्याचे श्राद्धविधी उरकल्याचेही त्याला कळले. आनंद आता मनाने कणखर झाला होता. त्याने सारे स्वीकारले. पोलीस इन्स्पेक्टरने रातोरात टेलिग्राम करून, मुंबईतील संबंधित पोलिस स्टेशनला आनंद सुखरूप सापडल्याचे कळवले. त्या रात्री आनंद माझ्यासमवेत होता. रात्रभर आमच्या गप्पा चालू होत्या. गप्पांमध्ये आनंद सहज म्हणाला,” सर ! तुमचे लग्न जेव्हा असेल, जिथे असेल, तिथे मी तेव्हा हजर होईन”.
 दुसऱ्या दिवशी सकाळी, पोलिसांच्या सल्ल्याप्रमाणे भीम भैयांनी, आनंदला एस.टी.ने, सोबत करत, मुंबईला त्याच्या घरी नेऊन सोडले.
या घटनेतील चमत्कार अजून संपला नव्हता. एक महिन्यानंतर वणीला माझ्या घरी आनंदचे वडील आले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. मला सांगू लागले,”साहेब! आनंद हट्ट करतोय. त्याला संन्यासी होऊन हिमालयात जायचे आहे. तो असा का वागतो आहे?. कदाचित तुम्ही त्याची समजूत काढू शकाल. कृपया मला मदत करा.”… त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले, ते असे समजत होते की,आनंद सहा महिने गायब होता, म्हणजे तो जंगलात रस्ता शोधत भटकत होता. आनंदनेही त्यांना मार्कंडेय ऋषी बद्दल सांगितले नव्हते, कारण त्यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. मी त्यांना सारी कहाणी सविस्तर सांगितली. नंतर त्यांना असा सल्ला दिला की प्रत्यक्ष चिरंजीव मार्कंडेय ऋषी त्याच्या पाठीशी आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे आनंद च्या बाबतीत काहीही अघटित घडणार नाही. त्याला आत्मज्ञान मिळवायचे आहे.आनंदला समाधान मिळणार असेल, तर एक दोन वर्षासाठी त्याला त्याच्या मनाप्रमाणे करू देत. वडिलांनी मान्य केले. त्याला हिमालयात ऋषिकेशला जाण्याची परवानगी दिली…..
मी कामाच्या धावपळीत सारे काही विसरून गेलो. वर्षभराने माझे ठाणे येथे लग्न होते. लग्न समारंभ चालू असताना अचानक भगवी वस्त्र धारण केलेला तेजस्वी तरुण स्टेजवर मला भेटायला आला. सगळ्यांच्या नजरा त्या तेजस्वी तरुणाकडे वळलेल्या होत्या. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि लक्षात आले. अरे! हा तर आनंद! माझ्या लग्नाविषयी काहीही माहिती नसताना हा इथे कसा आला?
माझ्या मनातील प्रश्न अचूक ओळखत संन्यासी आनंद स्मितहास्य करीत म्हणाला,”सर ! मी म्हणालो होतो ना, तुमच्या लग्नाच्या वेळी जरूर हजर असेन. माझा शब्द पुरा केला. आता पुन्हा आत्मज्ञानाच्या शोधात, हिमालयात जातो.”………
मला वणीला त्या रात्री आनंदशी केलेल्या गप्पांची आठवण झाली.
मार्कंडेय ऋषींनी आनंद च्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर, तो समाधी अवस्थेत गेला.साधन व समाधीअवस्थेत, सिद्ध लोकांना दिसते तसे त्याला सृष्टी-विज्ञान समजले….म्हणूनच तो पिंडी ते ब्रह्मांडी विचार करु लागला. असे म्हणतात,की जे समाधीत ज्ञान होते,याचा अर्थ ते,आपल्यातही आहे,म्हणूनच ते प्रतीत होते. या साऱ्याची खरी प्रचिती आता तो हिमालयात घेत असेल.
आधुनिक शास्त्रज्ञांनी प्राचीन वाड:मयाचा तौलनिक अभ्यास करून जगाला आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाची ओळख करून द्यायला हवी.
                                                            
    अशा घटना म्हणजे चमत्कार म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता, विज्ञानाच्या आधारे त्याचा पाठपुरावा करून, संगती लावण्याचा प्रयत्न खऱ्या ज्ञान साधकांनी करावयास हवा. आधुनिक शास्त्रा सोबत भारतातील प्राचीन शास्त्रांचा अभ्यास असेल, तर ही संगती अधिक परिपूर्ण होऊ शकते. विमानाचे उड्डाण, दूरचित्रवाणी, मोबाईल, हे जुन्या लोकांना चमत्कार वाटले असते. कालचे चमत्कार शास्त्राने आता प्रत्यक्ष अनुभवाच्या कक्षेत आणले आहेत. पुराणात उल्लेखलेले सिद्धांत यापुढे, शास्त्र तितके प्रगत झाले तर प्रत्यक्षात शक्य होतील.
आधुनिक विज्ञान, भारतीय वेद वांग्मयातील ऋषी निर्मित ज्ञान,योगशास्त्र,अध्यात्म.. हे सर्व, सर्व…शेवटी एकत्वातच सामावते…प्रश्न उरतो तो *ज्ञान-विज्ञान मय* होण्याचा.
(या घटनेवर विश्वास नसेल तर अशा व्यक्तींनी ती ‘कल्पनारम्य गूढकथा’ समजावी)
लेखक : प्रमोद टेमघरे, पुणे
कोळधेर वरून घेतलेला फोटो सोबत जोडला आहे, सर्वात मागे अंधुक रावळ्या जावळ्या, डाव्या कोपऱ्यात बंड्या, त्याच्या उजव्या बाजूला धोडप, धोडप च्या समोर ईखारा, त्यासमोर लेकुरवाळी, हंड्या, मंचन, कांचन आणि बाफळ्या. रावळ्याच्याजवळ मार्कंडेयाच्या डोंगर आहे.

Leave a Comment